मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मदतीबाबत आज, २५ सप्टेंबर रोजी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी दुष्काळासंदर्भातील शासन आदेश काढण्यात येईल, अशी माहिती दिली होती.
पावसाअभावी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार अनेक भागांनी दुष्काळ संहितेतील ‘ट्रिगर-१’ निकष गाठले आहेत. त्यानुसार बाधित भागांचा शासन आदेशात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची तयारी करत आहे. पाणी, चारा, अन्नधान्य, पीक नुकसानभरपाई आणि हेक्टरी थेट मदत यासारख्या उपाययोजनांवर सरकारकडून विचार केला जात आहे. मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दुष्काळाची व्याप्ती निश्चित करण्यासाठी पुढील टप्प्यातील मूल्यांकनही केले जाणार आहे. त्यामध्ये काही भागांचा समावेश राहिल्यास पुढील निकषांच्या आधारे त्यांचाही विचार केला जाऊ शकतो.
