पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील ८५ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची ₹१२ लाखांची फसवणूक झाल्याचे वृत्त आहे. आरोपींनी स्वतःला अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) अधिकारी असल्याचे भासवून त्यांना धमकावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ते ५ सप्टेंबरदरम्यान ही घटना घडली. १ सप्टेंबर रोजी पीडित व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ED अधिकारी म्हणून करून दिली. पीडिताच्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकावरून कथित त्रासदायक कॉल करण्यात आल्याचा तसेच त्यांच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर आरोपींनी मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक करण्याची धमकी देत बँक खात्याची माहिती मागितली. त्यानंतर ‘पडताळणीसाठी’ पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. ₹१२ लाख पाठवल्यानंतरही रक्कम परत मिळाली नाही. उलट आरोपींनी आणखी पैसे मागितल्याने फसवणूक झाल्याचा संशय पीडिताला आला.
यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. चिखली पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या फोन क्रमांक आणि बँक खात्यांची माहिती तपासली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून नागरिकांना अनोळखी व्यक्तींकडून फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास घाबरून पैसे हस्तांतरित करू नयेत, तसेच कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून फोनवरून ‘पडताळणी’च्या नावाखाली पैसे मागितले जात नाहीत, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
