पुण्यात व्यावसायिकाला ₹३० लाखांचा सायबर फटका

पुणे : व्यावसायिक भागीदार असल्याचे भासवून एका ४२ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाची ₹३० लाखांची सायबर फसवणूक झाल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी घडला असून, बावधन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने व्यावसायिकाच्या भागीदाराच्या नावाने संदेश पाठवून ₹३० लाख एका बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. संदेशावर भागीदाराचा फोटो असल्याने तक्रारदाराला संशय आला नाही. दोघांमध्ये यापूर्वीही अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार होत असल्याने त्यांनी कंपनीच्या खात्यातून रक्कम हस्तांतरित केली.

यानंतर तक्रारदाराने आपल्या खऱ्या व्यावसायिक भागीदाराशी संपर्क साधला असता, त्याने असा कोणताही संदेश पाठवला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही रक्कम लुधियाना, पंजाबमधील एका खासगी बँक खात्यात गेल्याचे समोर आले आहे. रक्कम थांबवण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी नागरिक आणि व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारांशी संबंधित संदेश मिळाल्यास केवळ नाव किंवा प्रोफाइल फोटोवर विश्वास न ठेवता स्वतंत्रपणे फोन करून व्यवहाराची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *