मुंबईतील भायखळा परिसरातील महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्पाचे आतापर्यंत २२ टक्के काम पूर्ण झाले आहे. भायखळ्यातील सीताराम सिलम उड्डाणपूल (वाय-ब्रिज) आणि जे.जे. उड्डाणपूल यांना जोडणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला महापालिकेने गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकल्पामध्ये मुख्य केबल-स्टेड पूल, व्हायाडक्ट तसेच पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारे फ्लायओव्हर आर्म्स उभारण्यात येणार आहेत. पश्चिमेकडील आर्मची लांबी सुमारे २९० मीटर, तर पूर्वेकडील आर्म सुमारे ३५० मीटर असणार आहे.
सध्या प्रकल्पाचे २२ टक्के भौतिक काम पूर्ण झाले असून, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मे २०२८चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र निर्धारित मुदतीपूर्वीच काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर भायखळा, नागपाडा आणि माझगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. तसेच पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशेने होणाऱ्या वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बांधकामाच्या काळात नागरिकांना कमीत कमी त्रास होण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
