मुंबई : वाढती महागाई आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी १ टक्क्यांहून अधिक घसरले. किरकोळ महागाईदर ऑक्टोबरमध्ये ६.२१ टक्के असा १४ महिन्यांच्या उच्चांकावर गेल्याने सेन्सेक्समध्ये ९८४ अंशांची घसरण झाली.
जागतिक पातळीवरील भांडवली बाजारातील निराशाजनक कामगिरीमुळे देशांतर्गत आघाडीवर एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये घसरण झाल्याने मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला. त्याजोडीला कंपन्यांची सरलेल्या सप्टेंबर तिमाहीतील असमाधानकारक कामगिरीने अधिक भर घातली. तसेच ताज्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दराने रिझर्व्ह बँकेची सहनशील पातळी मोडली आहे, मुख्यत्वे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर १४ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९८४.२३ अंशांनी घसरून ७७,६९०.९५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने १,१४१.८८ अंश गमावत ७७,५३३.३० ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे सलग पाचव्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३२४.४० अंश गमावले आणि तो २३,५५९.०५ पातळीवर स्थिरावला. सप्टेंबमधील निफ्टीच्या २६,२७७.३५ या सर्वोच्च उच्चांकी पातळीपासून निफ्टीमध्ये १० टक्क्यांहून अधिक पडझड झाली आहे.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्र बँकेच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे बाजार पडझडीत टाटा मोटर्स, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि इन्फोसिसच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी ३,३०२४.३१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
घसरणीची प्रमुख कारणे काय?
- महागाईदर ऑक्टोबरमध्ये ६.२१ टक्के असा १४ महिन्यांच्या उच्चांकी
- परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून अविरत समभाग विक्रीचा मारा
- डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी निवड आणि वाढलेल्या समभाग मूल्यांकनाबत गुंतवणूकदार चिंतातुर
- कंपन्यांची सरलेल्या सप्टेंबर तिमाहीतील असमाधानकारक कामगिरी