नागपूर: “सतत मोबाईलवर गेम खेळतो, अभ्यासाकडे लक्ष देत नाही!” अशी तक्रार अनेक पालक आपल्या मुलांबद्दल करतात. “मोबाईलवर गेम खेळून काय मिळणार?” असेही घरोघरी ऐकले जाते. मात्र, नागपूरच्या २३ वर्षीय वेद बांब यांनी मोबाईल गेमिंगच्या विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वेदने ‘पोकेमॉन गो’ या प्रसिद्ध मोबाईल गेमच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
अमेरिकेतील हवाईच्या होनोलुलू शहरात १६ ऑगस्टपासून पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपची सुरुवात झाली आहे, आणि यात वेदने भारताचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेत विजेत्याला २० लाख डॉलर म्हणजेच सुमारे १६ कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. वेद बांब हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहोचलेले ते पहिल्या भारतीय खेळाडू आहेत.
स्पर्धेची थरारकता
१६ ते १८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमेरिकेतील हवाईच्या होनोलुलू येथे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. जगातील सर्वात लोकप्रिय गेमिंग स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत वेद बांब आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी भारतातील ऑनलाइन पात्रता फेरीत सहभागी होऊन ५०० हून अधिक स्पर्धकांमधून दोन फेऱ्यानंतर विजेता ठरले. पुढील फेरीत त्यांनी भारतातील १५ सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळताना प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आणि आता ते होनोलुलू येथे भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.
पोकेमॉन गो म्हणजे काय?
पोकेमॉन गो हा एक ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) मोबाइल गेम आहे, जो निओन्टिकने निर्मित केला आहे. हा गेम पोकेमॉन फ्रँचाईझीचा एक भाग आहे. निन्तेंदो आणि पोकेमॉन यांच्या सहभागातून विकसित झालेली निओन्टिक कंपनी जगातील सर्वात मोठ्या एआर कंपन्यांपैकी एक आहे. या गेमने काही वर्षांपूर्वी भारतात मोठी लोकप्रियता मिळवली होती. खेळाडूंना एक स्थान सोडून दुसऱ्या स्थानावर पोकेमॉन पकडण्यासाठी जावे लागते, यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं होतं.
वेद बांबच्या या यशामुळे नागपूर आणि संपूर्ण भारताला अभिमान वाटावा, अशीच ही कामगिरी आहे.