तो आला आणि त्यानं जिंकून दाखवलं, असं म्हटलं की ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येतो. या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणारा महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार, रितेश देशमुख, या शोमध्ये अवतरला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन रितेश देशमुख होस्ट करणार असल्याचं जाहीर झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ग्रँड प्रीमियरच्या दिवशी रितेश भाऊने आपल्या अनोख्या अंदाजाने मंचावर धम्माल उडवली, ज्यामुळे प्रेक्षकांवर त्याची खास स्टाइल चांगलीच प्रभाव पाडून गेली. टीआरपी रेटिंग्सच्या आकडेवारीने याचा पुरेपूर पुरावा दिला आहे.
बिग बॉसने मोडला नवा रेकॉर्ड
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने इतिहास घडवला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या शोने, रितेश भाऊच्या धक्क्यांनी 3.2 TVR मिळवत, टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजी बाजार, कुठेही जा, सर्वत्र फक्त ‘बिग बॉस मराठी’ आणि रितेश भाऊच्या दमदार होस्टिंगचीच चर्चा सुरू आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडून 2.4 TVR मिळवला आहे, तर वीकेंडचे सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
पाचवा सीझन गाजला
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुखने चांगलाच गाजवला आहे. भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर घेतलेली हजेरी असो, किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो, या साऱ्या गोष्टींनी ‘बिग बॉस मराठी’चा प्रेक्षकवर्ग अधिक वाढवण्यात यश मिळवलं आहे. एक भाऊचा धक्का संपल्यानंतर दुसऱ्या धक्क्यावर काय होणार, याची उत्सुकता ‘बिग बॉस’प्रेमींमध्ये सतत आहे. या नव्या सीझनमधील नावीन्य आणि तरुणपण प्रेक्षकांना अधिक आकर्षित करत आहे.
रितेशने व्यक्त केला आनंद
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या यशाबद्दल रितेश देशमुख म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’च्या यशामध्ये आपल्या प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. रेटिंग्सचा चढता आलेख पाहणं खूपच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. भाऊच्या धक्क्यासह सर्वच एपिसोड्सवर महाराष्ट्रभरातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे ऋणी आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे मनापासून आभार.”