सर्वत्र ‘अट्टम’चीच धूम! ११ पुरुष आणि १ महिलेसह या चित्रपटाच्या कथेत काय आहे खास?

Aattam Movie: नुकतेच ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली, आणि यंदा मराठी, बॉलिवूड तसेच साऊथच्या चित्रपटांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. साऊथच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, आणि या चर्चेत आता आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे—‘अट्टम’. दिग्दर्शक आनंद एकर्षी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, आणि त्याला ‘बेस्ट फीचर फिल्म’चा पुरस्कार मिळाला आहे. ‘अट्टम’च्या विजयामुळे सगळीकडेच त्याच्या कथानकाची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटाला आणखी दोन पुरस्कार मिळाले आहेत: महेश भुवनेन्द्र यांना ‘बेस्ट एडिटिंग’साठी आणि आनंद एकर्षी यांना ‘बेस्ट स्क्रीनप्ले फॉर मल्याळम फिल्म’साठी. त्यामुळे आता सर्वांनाच या चित्रपटात काय वेगळं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हा चित्रपट ओटीटीवरदेखील रिलीज झाला आहे. चला, जाणून घेऊया ‘अट्टम’ची कथा काय आहे…

‘अट्टम’ म्हणजे काय?
‘अट्टम’ हा मल्याळी शब्द इंग्रजीत ‘द प्ले’ असा होतो. आनंद एकर्षी यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेला हा चित्रपट २०२३मध्ये रिलीज झाला होता. ‘अट्टम’ हा एक कोर्टरूम ड्रामा आहे, ज्याची कथा हॉलिवूड चित्रपट ‘ट्वेलव्ह अँग्री मॅन’वर आधारित आहे. या चित्रपटाची कथा एका थिएटर ग्रुपची आहे, ज्यात १२ सदस्य आहेत—त्यापैकी ११ पुरुष आणि १ महिला. या महिला सदस्यावर एक प्रसिद्ध अभिनेता लैंगिक शोषणाचा आरोप करतो, आणि याच आरोपावरून चित्रपटाची कथा सुरू होते.

काय आहे या चित्रपटाचं कथानक?
जेव्हा थिएटर ग्रुपमधील एकमेव महिला सदस्य अंजली लैंगिक शोषणाचा आरोप करते, तेव्हा गटातील ११ पुरुष सदस्य गोंधळून जातात. अंजली या ग्रुपमधील एकटी महिला आहे, आणि तिचे सहकारी तिला खूप चांगले वाटतात. विनय नावाच्या सदस्याविषयी ती खास भावना बाळगते. या ग्रुपमध्ये अनेक गोष्टी सुरू आहेत—अहंकाराची लढाई, राजकारण, आणि तरीही आपल्या सहकारी महिलेसाठी न्याय मिळवण्यासाठी सर्व ११ सदस्य मेहनत घेत आहेत. एका पार्टीत अंजली एका प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करते, आणि यामुळे ग्रुपमध्ये वैचारिक मतभेद उफाळून येतात. याचं कथानक काहीसं अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या ‘पिंक’सारखं आहे.

कथानकात काय आहे वेगळं?
‘अट्टम’ची कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे नाटक मंडळातील प्रत्येक सदस्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसू लागते. आनंद एकर्षी यांनी कथा अशा प्रकारे मांडली आहे की प्रेक्षक प्रत्येक पात्रावर शंका घेतात. या गटातील बहुतेक सदस्य असे आहेत, जे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर वेगवेगळ्या नोकऱ्या करतात. रंगमंचाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत नाही. अंजली एक आर्किटेक्ट आहे, तर विनय पार्ट-टाईम शेफ आहे. इतर सदस्यांमध्ये गॅस एजन्सीमध्ये काम करणारा, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि एक माजी वृत्तपत्र संपादक आहेत. या सर्वांची आर्थिक स्थिती आणि परिस्थिती कथेतील महत्त्वाच्या टप्प्यावर ठरते. हा चित्रपट एक मोठा गुन्हा गांभीर्याने मांडतो, आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा करण्यावर भर दिला पाहिजे, यावरही चित्रपटात भाष्य केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link