नाशिकमध्ये मुसळधार पावसाची नोंद; काही मिनिटांत 24 मिमी पाऊस, पुढील दोन दिवस यलो अलर्ट

नाशिक शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात 24 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.

नाशिकमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे खड्डेमय रस्त्यांवर चिखल आणि खडी पसरल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांचीही गैरसोय झाली.

पुढील दोन दिवस यलो अलर्ट

हवामान विभागाने नाशिकसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागासाठी IMDच्या 22 सप्टेंबरच्या अंदाजात 22 आणि 23 सप्टेंबरला मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जना-विजांचा इशारा देण्यात आला आहे.

पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली थांबणे टाळावे.

दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवार नाशिकमध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून, हवामान परिस्थितीनुसार पुढील इशाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी IMDच्या ताज्या हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *