नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी केलेल्या मूल्यवर्धित शेतमालाचे पैसे न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यवहारांसाठी देण्यात आलेले धनादेश वटले नसल्याने सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील एका खासगी कंपनीने विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रक्रिया केलेला शेतमाल खरेदी केला होता. या मालाच्या मोबदल्यासाठी संबंधित कंपनीने धनादेश दिले; मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हे धनादेश वटले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागपूर आणि चंद्रपूरमधील सात ते आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांची रक्कम थकीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, तक्रारीवर अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा दावा शेतकरी कंपन्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकरी कंपन्यांची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुमारे ७३ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची पुढील कारवाई आणि शेतकरी कंपन्यांना त्यांची थकीत रक्कम मिळते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
