छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जनासाठी पोलिसांची सज्जता; ३ हजारांहून अधिक पोलिस तैनात

छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी ३ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरात यंदा ९४१ सार्वजनिक गणेश मंडळे असून, सुमारे १ लाख ६५ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. मुख्य मिरवणुकीला संस्थान गणपती येथून सुरुवात होणार असून सिडको, नवीन छत्रपती संभाजीनगर आणि मुकुंदवाडी परिसरातही विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट, बीट मार्शल आणि मोबाइल पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आली आहेत. मिरवणुकीवर ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक, तर चोरी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *