नवी मुंबई : पारसिक हिल परिसरात गुरुवारी दुपारी एक कार डोंगराच्या उतारावरून थेट बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील रुळांवर कोसळली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आणि या मार्गावरील लोकल सेवा सुमारे ९० मिनिटे प्रभावित झाली.
अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कार हटविण्याची कार्यवाही सुरू केली. रुळांवर कार आल्याने एक लोकल थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि बचाव पथकांनी कार हटवल्यानंतर सेवा पूर्ववत करण्यात आली.
या अपघातात कार चालवणाऱ्या तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, त्याला दुखापत झाली असून पोलिसांकडून अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू आहे.
सुदैवाने कार रुळांवर कोसळली तेव्हा त्या ठिकाणी रेल्वेगाडी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर पारसिक हिल परिसरातील रस्ता आणि रेल्वे मार्गाच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
