सध्या री-रिलीजच्या ट्रेंडमध्ये सिनेमागृहात चालत असलेला सिनेमा म्हणजे ‘तुंबाड’. सिनेमाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्षे या सिनेमाला दिली. या चित्रपटाचे बऱ्याचदा बदललेले निर्माते, चित्रीकरणाच्या वेळी आलेल्या अनेक अडचणी यावर मात करून, निर्माता आणि अभिनेता सोहम शाहसह राही अनिल बर्वे यांनी हा सिनेमा तयार केला. सिनेमाचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं, पण जेव्हा २०१८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली. आता री-रिलीजच्या ट्रेंडमध्ये सिनेमा प्रेक्षकांची पसंती मिळवतोय. हा सिनेमा पुन:प्रदर्शित झाला तेव्हाच या सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिग्दर्शक राही अनिल बर्वे नसणार आहे.
नुकतंच दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन करणार नसल्याचं स्वत: सांगितलं आहे. राहीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली आहे.
काय म्हणाले राही…
राही यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “मी ‘तुंबाड’, ‘पहाडपांगिरा’ आणि ‘पक्षीतीर्थ’ या तीन कलाकृतींच्या कथेवर काम केले आहे. अनेक दशकांपासून मी यावर काम करत आहे, यामध्ये अनेक निर्माते बदलत गेले. पहिला चित्रपट ‘तुंबाड’ हा पितृसत्ताक लोभाच्या संकल्पनेवर आधारित होता. हा एक वडील, मुलगा आणि एक भूत (राक्षस) यांची कथा होती,” बर्वे यांनी सांगितलं.
“दुसरा चित्रपट ‘पहाडपांगिरा’ हा स्त्रीवादी विचारांच्या उदयावर आधारित असेल आणि त्याचबरोबर सती प्रथेवरील चर्चा करेल. या ट्रायोलॉजीचा तिसरा आणि शेवटचा भाग ‘पक्षीतीर्थ’ असेल,” असं त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं.
राही यांनी सोहम शाहला दिल्या शुभेच्छा
सोहम शाह आणि ‘तुंबाड’चा सह-दिग्दर्शक आदेश प्रसाद यांना ‘तुंबाड दोन’ साठी राही यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राही म्हणाले, “मी सोहम आणि आदेशला सर्व शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की ‘तुंबाड दोन’ देखील खूप यशस्वी ठरेल.”
सोहम शाह यांनी राही बर्वेंच्या ‘एक्स’ अकाउंटवरील पोस्टवर कमेंट करत त्यांना त्यांच्या आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या. सोहम शाह म्हणाला, “राही, तुला ‘गुलकंदा’ आणि ‘रक्तब्रह्मांड’ या प्रकल्पांसाठी शुभेच्छा. आणि लवकरच ‘पहाडपांगिरा’च काम सुरू कर. मजा येईल.”
बर्वे यांनी उत्तर देताना लिहिलं, “मी नेहमी तुझ्याबरोबर आहे.”
२०२५ मध्ये सुरु होईल ‘पहाडपांगिरा’ची निर्मिती प्रक्रिया
राही यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की ते २०२५ च्या मार्चमध्ये ‘पहाडपांगिरा’ची निर्मिती प्रक्रिया सुरू करतील. त्याआधी ते ‘गुलकंदा टेल्स’ आणि ‘रक्तब्रह्मांड’ या कलाकृतींचे काम पूर्ण करतील. ‘गुलकंदा टेल्स’ मध्ये कुणाल खेमू, पत्रलेखा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘रक्त ब्रम्हांड’ या वेबसीरीज मध्ये समंथा रुथ प्रभू, आदित्य रॉय कपूर आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘तुंबाड’ने री-रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १३.४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी २०१८ च्या मूळ प्रदर्शनाच्या वेळीच्या कमाईपेक्षा जास्त आहे.