“मी ‘तुंबाड’साठी सात वर्षं दिली”, अभिनेता सोहम शाहचे वक्तव्य; आमिर खानचा उल्लेख करत म्हणाला, “माझं वय वाढत होतं; पण…”

तुंबाड’ चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षं दिली, तसेच या सिनेमाचा निर्माता व अभिनेता सोहम शाहनंदेखील या सिनेमाला भरपूर वेळ दिला. चित्रीकरणावेळी आलेली अनेक संकटं, मनासारखी कलाकृती साकारण्यासाठी घेण्यात आलेले रिटेक्स, तसेच खर्च होणारा पैसा आणि वेळ यांबाबत सोहम आणि राही अनिल बर्वे यांनी अनेकदा सांगितलं आहे. ‘तुंबाड’ तयार करताना सोहमनं तब्बल सात वर्षं कोणत्याही वेगळ्या प्रकल्पात काम केलं नाही, असं त्यानं सांगितलं आहे. या प्रवासात आमिर खानच्या एका नियमामुळे तो सात वर्षं एकनिष्ठ राहू शकला, असं त्यानं स्पष्ट केलं.

आमिर खानचा ‘सुवर्णनियम’

सोहम म्हणतो, “सात वर्षं एकाच सिनेमावर काम करताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी मला आमिर खानच्या ‘एका वेळी एकाच प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करा आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी एकनिष्ठ राहा’ या नियमानं प्रेरणा दिली.”

२०१८ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतर नव्या प्रेक्षकांना भेटत आहे. या चित्रपटानं री-रिलीजमधून चांगली कमाई केली आहे. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास सोपा नव्हता. यादरम्यान सोहम शाह (Sohum Shah) यांनी आमिर खान (Aamir Khan) यांच्या या ‘सूत्रा’चा आधार घेतला. आमिर खान हा एका वेळी फक्त एकच चित्रपट करतो आणि तो पूर्ण झाल्यानंतरच पुढचा प्रोजेक्ट हाती घेतो.

सोहम शाहच्या अनुभवातील शिकवण

“मी सिनेसृष्टीत येण्याआधी मला हिंदी चित्रपटसृष्टीतूनच खूप काही शिकायला मिळालं आणि त्यात आमिर खानचा खूप मोठा प्रभाव आहे,” असं सोहम शाह म्हणतो. “एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करावं आणि ते उत्कृष्टतेनं पार पाडावं. यश हे त्याचेच परिणाम असतात. मी या नियमावर पूर्ण विश्वास ठेवतो.”

सात वर्षं न थांबता समर्पण

एका वेळी एकच काम पूर्ण मन लावून करावं, या साध्या नियमामुळे सोहम शाहला सात वर्षं ‘तुंबाड’साठी वेळ देण्याचं धाडस मिळालं. चित्रपटाच्या निर्मितीच्या लांबलचक प्रक्रियेत आणि अनेक री-शूट्समुळे त्याला अनेक असुरक्षिततेचा सामना करावा लागला होता, असं सोहम सांगतो. “माझं वय वाढतंय, मला इतर चित्रपट करायला पाहिजेत, असं वाटायचं; पण हा नियम सतत लक्षात राहिला आणि त्यानं मला आधार दिला; अन्यथा मी फार गोंधळ घातला असता,” असं सोहम शाह म्हणाला.

‘तुंबाड’नं इतिहास रचला आहे. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर २५ कोटींपेक्षा अधिक कमाई करून हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘तुंबाड’च्या निर्मात्यांनी नुकतीच ‘तुंबाड २‘ची घोषणा केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link