मुंज्या आता टीव्हीवर: सुपरहिट भयपट ‘मुंज्या’ ओटीटीवर नव्हे, तर टीव्हीवर होतोय प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Munjya TV Release: ‘मुंज्या’ या भयपटाची खूपच चर्चा झाली आहे. हा चित्रपट ७ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षक व समीक्षकांकडून खूप कौतुक मिळवले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली. कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ हा चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या दिग्दर्शकाने केले आहे, तसेच यात बऱ्याच मराठी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सिनेमागृहांमध्ये मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर, प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटी आधी टीव्हीवर पाहण्याची संधी मिळणार आहे.

ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही, असे अनेक लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत होते. जरी चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नसली तरी, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे—कारण ‘मुंज्या’ हा चित्रपट आता ओटीटीपूर्वी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.

टीव्हीवर कधी पाहता येणार ‘मुंज्या’?
हा चित्रपट शनिवार, २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता स्टार गोल्ड चॅनलवर प्रसारित होणार आहे. पुढील वीकेंडला तुम्ही संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट टीव्हीवर पाहू शकता. ‘मुंज्या’ हा चित्रपट कोकणातील लोककथेवर आधारित आहे, त्यामुळे त्याची वेगळीच आकर्षण आहे.

३० कोटींचे बजेट, १२३ कोटींची कमाई
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’, आणि ‘भेडिया’नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट ‘लिजेंड ऑफ मुंज्या’भोवती फिरतो. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ३० कोटी रुपये खर्च केले होते, आणि त्याने भारतात ११८ कोटी, तर जगभरात १२३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या हिंदी चित्रपटात मोना सिंग, शर्वरी वाघ, आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तसेच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, आणि श्रुती मराठे यांच्यासारख्या कलाकारांचाही समावेश आहे.

‘पिंकव्हिला’च्या रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ फेम अभिनेता अभय वर्माला शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटातील एका भूमिकेची ऑफर मिळाली आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खानदेखील असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत असून निर्मिती शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट करणार आहे. अभय वर्माच्या भूमिकेबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link