श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग करत मोठा धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते आणि आता दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई करत, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असे दिसत आहे.
‘स्त्री २’ने गुरुवारी पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ६०.३ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामध्ये बुधवारच्या पेड प्रिव्ह्यूची कमाईही समाविष्ट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच मोठा गल्ला जमवत २०२३ मधील ‘अॅनिमल’ आणि ‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनलाही मागे टाकलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही चित्रपटाने ३० कोटींचे कलेक्शन करत दोन दिवसांत ९०.३ कोटी रुपये कमावले आहेत. या आकड्यांवरून चित्रपट आज १०० कोटींचा टप्पा ओलांडेल असं स्पष्ट दिसतं आहे.
‘वेदा’ आणि ‘खेल खेल में’च्या कमाईत मोठी घसरण
‘स्त्री २’ बरोबरच १५ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी पाच कोटींहून अधिक कमाई केली होती, पण दुसऱ्या दिवशी या चित्रपटांच्या कमाईत मोठी घसरण दिसून आली. अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ने दुसऱ्या दिवशी फक्त १.९ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे त्याची एकूण कमाई ६.९५ कोटी रुपये झाली आहे. तर जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ने दुसऱ्या दिवशी फक्त १.६ कोटी रुपयांची कमाई करत एकूण ७.९ कोटी रुपये गाठले आहेत.
‘वेदा’ आणि ‘खेल खेल में’ व्यतिरिक्त, १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या प्रादेशिक चित्रपटांमध्ये तेलुगुतील ‘डबल इस्मार्ट’, तमिळमधील ‘थंगालन’, आणि तेलुगुतील ‘मिस्टर बच्चन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ने बाजी मारली आहे.