अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या गूढ मृत्यूपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येवर संशय व्यक्त झाला होता आणि यासंदर्भात तपास सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अनिल देशमुखांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या आरोपांसाठी सबळ पुरावे आहेत आणि ते वेळ आल्यावर सादर करतील. अनिल देशमुखांच्या आरोपांनंतर श्याम मानवांनी दावा केला आहे की, अनिल देशमुख आत्महत्या करण्याच्या विचारात आले होते. त्यामुळे राजकारणात नवीन आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुखांनी काय म्हटले?
अनिल देशमुख यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत, श्याम मानवांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांवर भाष्य केले. श्याम मानवांनी उद्धव ठाकरेंना अडकवण्याचा कारस्थान झाल्याचा दावा केला होता. त्यावर अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हे कारस्थान करण्याचा आरोप केला.
“तीन वर्षांपूर्वी, खोटे आरोप करून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर प्रतिज्ञापत्र देण्यास मला सांगण्यात आले. मी नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली,” असे अनिल देशमुख म्हणाले. “देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसाला माझ्याकडे पाठवले. त्यांनी मला चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले. हे मी केले असते तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अडचणीत आले असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“त्यांनी मला खोटे आरोप लावण्यास सांगितले. उद्धव ठाकरेंवर आरोप करायला सांगितले की त्यांनी मला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पैसे जमवायला सांगितले. आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितला की त्यांनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिलं,” असे देशमुख म्हणाले.
“मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीसांनीच माझ्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते,” असे ते म्हणाले.
नकार दिल्यानंतर दुसरी ऑफर
नकार दिल्यानंतर अजित पवारांना वगळून इतर तिघांवर खोटे आरोप करण्यास सांगितल्याचे अनिल देशमुख म्हणाले. “देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, अजित पवार विरोधात आरोप करण्यास अडचण असल्यास उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर आरोप करा,” असे ते म्हणाले.
अनिल देशमुख आत्महत्येच्या पर्यायापर्यंत आले होते!
अनिल देशमुखांच्या आरोपानंतर श्याम मानवांनी स्पष्ट केले आहे की, अनिल देशमुखांवर इतका दबाव होता की त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता, पण त्यांनी अखेरीस ते पाऊल उचलले नाही.