भंडारा: छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या मोर्चासाठी भंडारा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार महिलांना दिशाभूल करून नेण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना सहलीसाठी नेत असल्याचे सांगण्यात आले आणि मोर्च्यात सहभागी होण्यासाठी त्यांना आणण्यात आले. परंतु, दोन दिवसांपासून या महिलांना वाऱ्यावर सोडण्यात आले असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे महिलांनी सांगितले. काल रात्री ‘लोकसत्ता’मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यावर एकच खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरमधील प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तत्काळ दखल घेत या महिलांच्या मदतीला धाव घेतली. सध्या काही महिला शेगाव येथे तर काही परतीच्या प्रवासात आहेत.
८ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात गर्दी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. पण, भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्तीचे सभासद मंडळ बरखास्त झाल्यामुळे, प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी या जबाबदारीचा स्वीकार केला. त्यांनी महिलांना शेगाव, शिर्डी आणि औरंगाबाद येथे सहलीसाठी नेत असल्याचे खोटे सांगून मोर्चात सहभागी होण्यासाठी नेले. गुंथारा, खुटसावरी, चांदोरी, कवलेवाडा, धारगाव, पहेला, टेकेपार, सातोना, खुरशीपार, राजेदहेगाव अशा विविध गावांतील ३० ते ४० ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये जवळपास दीड हजार महिलांना घेण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचल्यावर महिलांना मोर्चात सहभागी होण्याची माहिती देण्यात आली. काही महिलांनी त्यासाठी नकार दिला, तर काहींनी सहभागी होण्यास मान्यता दिली. एका महिलेने सांगितले की, त्यांची ट्रॅव्हल्स औरंगाबाद येथे अडून बसली होती. ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे दिले नाहीत त्यामुळे डिझेल संपल्याने ट्रॅव्हल्स चालक अडले होते. दोन दिवसांपासून महिलांना आणि लहान मुलांना नाश्ता मिळाला नाही, राहण्याची, खाण्याची किंवा परत जाण्याची सोय नाही. यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गीता बंसोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपबिती सांगितली आणि त्यानंतर माध्यमांवर बातमी येताच सर्वत्र खळबळ उडाली. काही त्रस्त महिलांनी जालना पोलिस ठाणे गाठले. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी औरंगाबादचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला आणि महिलांना मदतीसाठी बोलणे केले. त्यानंतर महिलांना एका ढाब्यावर जेवणासाठी नेण्यात आले, पण जेवणाचे बील त्यांनी स्वतःच्या खिशातून भरल्याचे सांगितले.
गीता बंसोड यांनी माध्यमांना माहिती पुरवू नये म्हणून त्यांच्या बचत गटाच्या ग्रुपमध्ये त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते ट्रॅव्हल्स चालकांशी संपर्क साधून महिलांना परत जाण्यासाठी आवश्यक डिझेल भरून दिले. सध्या काही महिला परतीच्या मार्गावर आहेत, तर काही शेगाव येथे आहेत.
बच्चू कडू यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांना सुरवातीला ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यात अंकुश वंजारी याला ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. मात्र, पैसे घेऊन तो मोबाईल बंद करून फरार झाला आहे. त्याच्याशी संपर्क साधता आलेला नाही. बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यकांनी सांगितले की, अंकुश वंजारी याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास अंकुश वंजारीविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात येईल.