अकोला : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह दिले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार विविध चिन्हांवर निवडणूक लढले होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचे सर्व उमेदवार एकाच ‘गॅस सिलिंडर’ चिन्हावर निवडणूक लढवू शकतील. निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी अधिकृत चिन्ह दिल्यामुळे वंचित आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
वंचित आघाडीने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती होण्याचे प्रयत्न असफल ठरले, ज्यामुळे वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, आणि एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये पक्षाचा जनाधार कमी झाल्याचे दिसून आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात तिरंगी लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत ॲड. आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह मिळाले होते, तर इतर उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती.
अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवताना ॲड. आंबेडकर ‘गॅस सिलिंडर’ चिन्हासाठी आग्रही होते. त्यांनी यापूर्वी अकोल्यातून लोकसभेच्या ११ निवडणुका लढवल्या आहेत, ज्यात त्यांना उगवता सूर्य, बंगला, कपबशी आदी चिन्हे मिळाली होती. ‘गॅस सिलिंडर’ चिन्हासाठी ॲड. आंबेडकर यांनी अगोदरच अर्ज देखील केला होता. मात्र, दोन उमेदवारांनी त्याच चिन्हावर दावा केल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढावी लागली, ज्यात ॲड. आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह देण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीत ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह न मिळाल्याची खंत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात कायम होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ‘गॅस सिलिंडर’ या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती, जी अखेर मान्य करण्यात आली. आता राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढणाऱ्या सर्व उमेदवारांना ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह मिळणार आहे. पसंतीचे चिन्ह मिळाल्यामुळे वंचित आघाडीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.