गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात विशेष तपासणी मोहीम राबवली. 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान मुंबईतील 38 खाद्य आस्थापनांची तपासणी करून 47 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये दूध, खवा, तूप आणि मिठाईच्या नमुन्यांचा समावेश होता.
तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि खाद्यपदार्थ हाताळणीसंदर्भात नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. मुंबईतील चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, त्यात कोलाब्यातील प्रसिद्ध कॅफे मोंडेगर, कांदिवली पूर्वेतील महाराष्ट्र बिर्याणी सेंटर, घाटकोपर पश्चिमेतील त्रिभुवन डेअरी फार्म आणि घाटकोपर पूर्वेतील महावीर काजू अँड फूड्स यांचा समावेश आहे.
कॅफे मोंडेगरच्या तपासणीत गरम खाद्यपदार्थ निर्धारित तापमानापेक्षा कमी तापमानात ठेवणे, कोल्ड स्टोरेजचे तापमान योग्य न राखणे, अन्न थंड करण्याच्या प्रक्रियेत त्रुटी तसेच स्वच्छता आणि ड्रेनेजशी संबंधित समस्या आढळल्याचे FDAने सांगितले.
दरम्यान, राज्यभरातील मोहिमेत 4,138.7 किलो डेअरी व मिठाई उत्पादने आणि 30 लिटर दूध, एकूण सुमारे ₹15.58 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यात खवा, पनीर, तूप, पेढे, हलवा, श्रीखंड, बटर आणि मिल्क पावडर यांचा समावेश आहे.
FDAच्या या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन यावर प्रशासनाने अधिक कडक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
