नवी मुंबई : बेलापूरमधील पारसिक हिल परिसरातून कार थेट बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील रुळांवर कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. कार रुळांवर आल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला आणि एक लोकल थांबवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रुळांवर पडलेली कार हटवण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. कार हटवल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, कार नेमकी कशामुळे रुळांवर कोसळली, याचा तपास नवी मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उतारावरून खाली घसरल्याचे समोर आले आहे; मात्र अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेत कारमधील चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कार रुळांवर पडली तेव्हा त्या ठिकाणी रेल्वेगाडी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
