मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनाचा सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठी यंत्रणा तैनात केली आहे. २५ हजारांहून अधिक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी विविध विसर्जन स्थळांवर आणि मार्गांवर कार्यरत आहेत.
मुंबईत विसर्जनासाठी ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि २७८ ठिकाणी ३८३ कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समुद्रकिनारे आणि इतर प्रमुख विसर्जन स्थळांवर सुरक्षेसाठी १,१३२ जीवरक्षक, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २२८ नियंत्रण कक्ष, ७५ निरीक्षण मनोरे आणि २६१ स्वागत केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच विसर्जन मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छतेची कामेही करण्यात आली आहेत.
मुंबईकरांनी विसर्जनादरम्यान महापालिका आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, तसेच सुरक्षिततेसाठी निर्धारित विसर्जन स्थळांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
