पुण्यात गणेशोत्सवातील 13 दिवसांची दारूबंदी मागे; हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतर निर्णयात बदल

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेली 13 दिवसांची दारूबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यालाच दीर्घकाळ दारूबंदी का लागू करण्यात आली, असा सवाल करत प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 3 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या काळात सलग 13 दिवस मद्यविक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. या निर्णयाला वाईन शॉप आणि बार मालकांसह संबंधित संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुण्यालाच अशा प्रकारे लक्ष्य का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

राज्य सरकारच्या वतीने ही बंदी सार्वजनिक हित आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, न्यायालयाने इतक्या दीर्घ कालावधीसाठी blanket ban लागू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यानंतर प्रशासनाने निर्णयात बदल करत 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच मद्यविक्रीवर निर्बंध ठेवण्याचे जाहीर केले. तसेच 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आधी जाहीर करण्यात आलेली 13 दिवसांची दारूबंदी आता लागू राहणार नाही.

या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या काळात मद्यविक्री व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *