मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात MPSCच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, परीक्षेपूर्वीच गोपनीय प्रश्नसंचातील प्रश्न बाहेर काढून काही उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील २९४ प्रश्न चोरी करून त्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात MPSCचे अधिकारी, क्लास चालक, उमेदवार आणि संबंधित नातेवाईकांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर MPSCने औषध निरीक्षक पदाची भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, फेरपरीक्षेची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून या पेपरफुटीच्या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संपूर्ण नेटवर्क कसे कार्यरत होते, याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याकडे उमेदवारांसह राज्याचे लक्ष लागले आहे.
