नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूंना आलेल्या आव्हानांचा, त्यावर मात करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा, आणि त्यांना मिळालेल्या पाठिंब्याचा सगळा प्रवास स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खेळाडूं यांच्यातील संवादातून उलगडला.
स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्यावर झालेल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी खेळाडूंशी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादाची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाल्यावर भारतीयांना पॅरिस ऑलिम्पिकच्या रोमांचक क्षणांचा अनुभव घेता आला.
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनशी संवाद साधताना पंतप्रधानांनी म्हटलं, “तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू खूप लहान होतास, पण आता तू एक वलयांकित खेळाडू बनला आहेस.” लक्ष्य सेनने आपल्या उपांत्य फेरीच्या प्रवासाची कथा सांगितली, ज्यात प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी त्याला मोबाईल वापरण्यास मनाई केली होती आणि स्पर्धा संपल्यावरच मोबाईल परत मिळवण्याचे सांगितले. यावर पंतप्रधान मोदींनी मजेशीर टिप्पणी करत सांगितले, “प्रकाशसर इतके कडक असतील तर पुढच्या वेळेसही त्यांनाच पाठवेन.”
पॅरिस ऑलिम्पिकच्या पर्यावरणपूरक प्रयत्नांबद्दल मोदींनी हसत हसत विचारले की, खेळाडूंना वातानुकूलित खोलींची सुविधा मिळाली की नाही. काही खेळाडू काहीच बोलले नाहीत, पण मोदींनी नंतर सांगितले की क्रीडा मंत्रालयाने ४० वातानुकूलित प्रवासी यंत्रांची व्यवस्था केली आहे आणि खेळाडूंसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंगला पंतप्रधानांनी ब्रिटनविरुद्ध १० खेळाडूंसह खेळण्याच्या अनुभवाविषयी विचारले. हरमनप्रीतने सांगितले की सहाय्यक प्रशिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि ब्रिटन संघाविरुद्ध जुन्या शत्रुत्वामुळे अधिक प्रेरणा मिळाली.
पंतप्रधान मोदींनी अपयशी खेळाडूंना देखील दिलासा दिला. “अपयशी खेळाडूंनी निराश होण्याचे काही कारण नाही. तुम्ही काही शिकून परत आलात आणि हे क्षेत्र असे आहे जिथे कुणी हरत नाही. तुमच्या अनुभवांनी ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी उपयोगी पडतील. तुम्ही भारताचे सैनिक आहात,” असे मोदींनी सांगितले.