भंडारा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची नावे मागवली आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने उमेदवारी साठी अर्ज सादर केला आहे. यामुळे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काही महिनेच शिल्लक आहेत. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही तयारीत आहेत. महाविकास आघाडी १६ ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार असून, महायुती २० ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाला आहे, त्यामुळे नाना पटोले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
अर्जासोबत नाना पटोले यांनी पक्षाच्या आदेशानुसार वीस हजार रुपयांचा डीडी देखील पक्षाला सादर केला आहे. साकोलीसह भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण १८ उमेदवारांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. नाना पटोले यांचा अर्ज भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्याकडे काँग्रेस प्रतिनिधी आणि स्वीय सहाय्यक राजू पालीवाल यांनी सादर केला आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते.
नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लोकसभा निवडणुका लढवल्या आणि त्यात भरघोस यश मिळवले. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधील काही नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते, ज्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. या यशस्वी नेतृत्वामुळे नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद कायम राहिले आहे आणि आगामी विधानसभा निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वातच लढल्या जाणार आहेत, असे निश्चित झाले आहे.