Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. तसेच महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. पुढच्या काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) स्पष्ट होईल. त्यानंतर राज्यात नेमकी कोणाचं सरकार येणार? महाविकास घाडीला किती जागा मिळाल्या? हे स्पष्ट होईल. मात्र, महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. त्यामुळे यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आहेत. “माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं”, असं शिंदे यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“तमाम मतदारांचं मी आभार मानतो. मी सर्व मतदारांचे आभार मानतो. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल. मी याआधी सांगत होतो की, महायुतीला मोठा विजय मिळेल. त्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. लाडक्या भावांनी मतदान केलं. लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं. तसेच जेष्ठ मतदारांनीही मतदान केलं. समाजातील प्रत्येक घटकांनी मतदान केलं. लोकांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. गेली दोन ते अडीच वर्ष महायुतीने जे काम केलं. त्या कामाची पोहोचपावती या निवडणुकीत जनतेनी दिली. त्यामुळे जनतेचे आभार मानतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.