Amit Shah On Rahul Gandhi : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे महायुती आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील जोरदार प्रचार सुरु आहे. मग प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं असून निवडणुकीची रंगत वाढली आहे. विविध मतदारसंघात अनेक नेत्यांच्या सभा आणि मेळावे पार पडत आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याही सभा राज्यातील विविध मतदारसंघात पार पडत आहेत. आज त्यांची धुळे जिल्ह्यात एक सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० बाबत काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. राहुल गांधी पुन्हा कलम ३७० लागू करण्यासाठी प्रस्तावर आणत आहेत. मात्र, आता इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम ३७० पुन्हा आणू शकणार नाहीत, असा हल्लाबोल अमित शाह यांनी काँग्रेसवर केला.
अमित शाह काय म्हणाले?
“काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता म्हणत आहेत की, पुन्हा कलम ३७० आणलं जाईल. त्याबाबत त्यांनी एक प्रस्ताव आणला आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम ३७० आणू असंही ते म्हणत आहेत. मात्र, मी त्यांना सांगतो की, राहुल गांधी तुम्ही तर सोडा इंदिरा गांधी जरी स्वर्गातून परत आल्या तरी ३७० कलम पुन्हा आणू शकणार नाहीत”, अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स सरकारचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० (Article 370) म्हणजे तत्कालीन विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. यावरूनच आता अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधीपक्षावर जोरदार हल्लाबोल केला.