IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

India vs South Africa 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-२० मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत भारताचा ३ विकेट राखून पराभव केला. आता तिसरा सामना उद्या म्हणजे १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनच्या मैदानावर होणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पण या सामन्याची वेळ दुसऱ्या सामन्यापेक्षा वेगळी आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची योग्य वेळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झाला होता. मात्र तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल झाला आहे. हा सामना एका तासाने उशिरा म्हणजे भारतीय वेळेनुसार ८.३० वाजता सुरू होईल आणि या सामन्याची नाणेफेक रात्री ८ वाजता होईल. त्यामुळे हा सामना रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. यानंतर, दोन्ही संघांमधील चौथा आणि अखेरचा टी-२० सामना १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे, जो भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता खेळवला जाईल.

सेंच्युरियन मैदानावरील रेकॉर्ड

सेंच्युरियन मैदानावर आतापर्यंत एकूण १६ टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत. तर ७ सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. संघाने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २५९ धावा केल्या होत्या.

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. १०० धावांचा टप्पा पार करण्यात संघ कसा तरी यशस्वी झाला होता. त्यानंतर हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३९ धावांची खेळी खेळली होती. यासह भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १२४ धावांचे दक्षिण आफ्रिकेला आव्हान दिले होते. नंतर वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याने आपल्या ४ षटकात १७ धावा देत ५ विकेटही घेतले. पण अखेरच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांची धुलाई झाल्याने भारताने हा सामना गमावला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link