‘सावळ्याची जणू सावली'(Savlyachi Janu Savli) या मालिकेत सध्या एकीकडे सावली आणि दुसरीकडे सारंग यांच्या लग्नाची गडबड चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत आता नवीन वळण येण्याची शक्यता असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रोमो शेअर केला आहे.
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये सावली आणि सारंग दोघेही लग्नाच्या वेशभूषेत दिसत आहेत. दोघांनीही कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत. सावली म्हणते, “विठ्ठला, आजपर्यंत मला सरळ सोपं काहीच मिळालं नाही. हे जे माझ्यासमोर आलंय ना, ते मी आनंदानं निभावेन. त्याची साथ मी कधीच सोडणार नाही.” पुढे पाहायला मिळते की, सारंग त्याच्या हाताकडे बघत म्हणतो, “हातात आलेल्या त्या हातानं आयुष्यातला अंधार दूर झाला. आता तो हात कधीच सुटणार नाही. आयुष्यभर ती माझी सावली बनून राहील.”
झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना, ‘सावली आणि सारंगची लग्नगाठ बांधली जाणार का?’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सारंग हा श्रीमंत घरातील मुलगा आहे. त्याचे अस्मी नावाच्या मुलीशी लग्न ठरले आहे; तर सावली ही गरीब घरातील मुलगी आहे. तिच्या घरची परिस्थिती खूपच बेताची आहे. सावलीचा भाऊ अप्पूच्या औषधोपचारासाठी तिच्या कुटुंबीयांना पैशांची गरज असते. सावलीचा आवाज चांगला आहे. त्याचा गैरफायदा घेत, भैरवी वझे तिचा आवाज गहाण ठेवण्यासाठी दबाव टाकते आणि हा आवाज मग ती तिची मुलगी तारासाठी वापरते. सावलीच्या आवाजाला मोठी प्रसिद्धी मिळते. मोठमोठे कार्यक्रम होतात; मात्र सगळ्यांना हा आवाज ताराचा आहे, असे वाटत असते. सारंगची होणारी बायको अस्मी ही जगन्नाथ शेठ यांच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर प्रेमाचे नाटक करत असते; मात्र त्याची संपत्ती पाहून तिला त्याच्याबरोबर लग्न करण्याचा मोह होतो. दुसरीकडे सावलीचेदेखील काही दिवसांपूर्वी लग्न ठरले आहे.
आता मालिकेत काय होणार, सारंग आणि अस्मीचे लग्न मोडणार का, सावलीचे ठरलेले लग्न मोडणार का, सारंग आणि सावलीचे लग्न कोणत्या परिस्थितीत होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.