Lakhat Ek Amcha Dada Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये आता प्रेमाचे रंग पाहायला मिळणार आहेत. बालपणापासून सूर्या ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता ती तुळजा आता सूर्याच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे सूर्या आणि तुळजाच्या नात्याला आता नवीन वळण आलं आहे. अशातच तुळजाने सूर्याला नदीकाठी खास सरप्राइज देऊन प्रपोज केलं आहे. याचा सुंदर प्रोमो नुकताच समोर आला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुळजा सूर्याबरोबर नदीकाठी फिरताना दिसत आहे. यावेळी दोघांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. सूर्या तुळजाला म्हणतो, “आपण इथे घर-घर खेळायचो.” तेव्हा तुळजा म्हणते, “तू नेहमी हे बोलायचा की, या घाटावर आपण आपलं घर बांधू या. मी घर बांधू नाही शकले पण तुझ्यासाठी हे तयार केलंय.”
तुळजाने घाटावर सूर्याला पप्रोज करण्यासाठी एक सुंदर अशी खोली तयार केलेली दिसत आहे; जी फुलांनी, वेलींनी सजवली आहे. हे पाहून सूर्या म्हणतो, “तुळजा हे कशासाठी?” तेव्हा तुळजा म्हणते की, मी तुझ्या प्रेमात पडली आहे. हे ऐकून सूर्या टाळ्या वाजवत म्हणतो, “लय मोठा जोक केलास.” त्यानंतर तो जोरजोरात हसू लागतो. तेव्हा तुळजा चिडते आणि म्हणते, “प्लीज हसू नकोस. नाहीतर मी घाटावरून नदीत उडी टाकेन.” त्यानंतर तुळजा नदीत उडी टाकते. हे पाहून लगेच सूर्या तिला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकतो आणि म्हणतो, “तू उडी का मारलीस?” तेव्हा तुळजा जोरात ओरडते की, आय लव्ह यू सो मच सूर्या….हे ऐकून सूर्याला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्यामुळे आता यापुढे काय होतं? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. ‘लय भारी’, ‘वाव’, ‘खूप छान प्रपोज केलंय’, ‘खूपच भारी यार’, अशा प्रतिक्रिया प्रोमोवर उमटल्या आहेत. सूर्या आणि तुळजाची प्रेमाची गोष्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.