Aditya Thackeray : शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? मुख्यमंत्री कोणला करायचं यासाठी जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असं विधान आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याविधानावरूनच आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. याबाबत बोलताना, मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचं नाव नसेल, तर देवेंद्र फडणवीस यांचही नाव नाही, शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
जोडे मारो आंदोलनावरील टीकेलाही दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरही टीकाही केली होती. या टीकेलाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार केला, त्यांना जोडे मारणंही कमी आहे. भाजपा इतकी निर्लज्य कशी असू शकते. इतकचं नाही, या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हे हेलिपॅड उभारण्यात आलं, त्याच्यावर पुतळ्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे. स्टॅचू ऑफ लिबर्टी गेली १३८ वर्ष उभा आहे, तिथे उन, वारं, बर्फ सगळंच पडतो. पण आपल्या इथे मुख्यमंत्री निर्लज्यपणे वाऱ्यामुळे पुतळा पडला, असं सांगतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा, यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत जातो. तरीही आमच्या दिल्ली भेटीवर टीका केली जाते. उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली. पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागले नाही. आता तर शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. त्यावर नाना पटोलेंनीही हीच री ओढली. उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही. पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.