मुंबई : विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. दरवर्षी विविध सामाजिक संदेश, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळांचे देखावे लक्षवेधी ठरतात. यंदा मुंबईतील गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेता येणार असून निरनिराळ्या ऐतिहासिक स्थळांची सफरही करता येणार आहे.
गतवर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत सर्वत्र उत्साही माहोल होता. त्यामुळे श्री रामाच्या रूपातील गणेशमूर्ती आणि अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारला होता. अखेर २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यामुळे यंदाही अयोध्येतील राम मंदिराचा प्रभाव सार्वजनिक गणेशोत्सवावर पाहायला मिळत आहे.
श्रीरामरूपी गणेशमूर्तीही घडविण्यात आल्या असून घरगुतीसह सार्वजनिक मंडळांमध्ये राम मंदिराचे देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा खेतवाडी १२ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचा देखावा साकारला आहे.
तसेच गणेशमूर्तीची प्रभावळही अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीच्या प्रभावळसारखीच आहे. या मंडळाचा गणपती ‘खेतवाडीचा गणराज’ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच चेंबूरमधील टिळक नगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाने ‘संकटमोचन हनुमान मंदिरा’चा देखावा साकारला आहे. हा देखावा लक्षवेधी ठरत असून पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर आणि तेथील निसर्गसौंदर्याबाबत तरुणाईमध्ये कमालीचे आकर्षण असते. हेच जाणून लोअर परळ विभाग (पश्चिम) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. हा भव्य देखावा लोअर परळमधील फिनिक्स टॉवरशेजारील मैदानात साकारण्यात आला आहे.
या मंडळाचा गणपती ‘लोअर परळचा महाराजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. तर ‘परळचा इच्छापूर्ती’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा दाक्षिणात्य प्रदेशातील पौराणिक मंदिराचा देखावा साकारला आहे. दरवर्षी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गणेशगल्लीत प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि विविध मंदिरांचे भव्य देखावे साकारले जातात. हे देखावे पाहण्यासाठी दिवस – रात्र गर्दी पाहायला मिळते. यंदा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गणेशगल्लीत उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. मंदिराची ही प्रतिकृती जवळपास १२० फूट उंच आणि १५० फूट रुंद अशा विस्तीर्ण स्वरूपात साकारण्यात आली आहे.
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील गाभाऱ्यावर आधारित सजावट केली आहे. तसेच गणेशमूर्ती ही श्रीकृष्णाच्या रूपात विराजमान आहे. तसेच, मुंबईतील काही मंडळांनी इस्कॉन मंदिर व या मंदिरातील गाभाऱ्यावर आधारित लक्षवेधी सजावट केली आहे.