पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरलेल्या भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट शनिवारी सकाळी मायदेशी परतली. दिल्ली विमानतळावरून बाहेर आल्यानंतर तिथे जमलेल्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं, ज्यामुळे विनेश फोगट भावुक झाली. तिचा या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते, त्यावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाबद्दल विनेशने क्रीडा लवादाच्या न्यायालयात रौप्य पदक देण्याची याचिका केली होती, पण १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिची याचिका फेटाळली गेली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन मायदेशी परतल्यावर विनेशला मिळालेल्या स्वागताने ती अत्यंत भावुक झाली.
विनेश फोगटने सांगितले, “मी सर्व देशवासीयांचे आणि येथे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.” तिच्या मायदेशी परतल्यावर झालेल्या स्वागताने तिला चॅम्पियनप्रमाणे आदर दिला गेला. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यावर विनेशने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. दिल्ली विमानतळावर तिचं स्वागत करण्यासाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि इतर अनेक कुस्तीपटू उपस्थित होते. विनेशचे कुटुंबीयदेखील स्वागतासाठी आले होते.
विनेश फोगटचा भाऊ हरिंदर पुनिया यांनी एएनआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जे लोक कुस्ती आणि खेळाचे चाहते आहेत, ते आज विनेशचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आले आहेत. घरी देखील स्वागताची तयारी सुरू आहे. ती ऑलिम्पिक पदक जिंकू शकली नसेल, पण आम्ही अधिक मेहनत घेण्यासाठी तिला मदत करू.” विमानतळावरच्या स्वागतामुळे विनेशला आपल्या अश्रूंचा आढळ आवरता आलेला नाही.