भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप

नागपूर : दत्ताजी डिडोळकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण मंचाची प्रतिमा अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी धुळीस मिळवली आहे. भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. पांडे यांची मनमानी सुरू आहे. विद्यापीठाच्या कुठल्याही प्राधिकरणावर नसताना संशोधक विद्यार्थिनींच्या न्यायासाठी पुढे येऊन, डॉ. पांडे यांनी संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा काढून घेत मानसिक छळ करून शैक्षणिक नुकसान केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांच्या विरोधात दोन संशोधन विद्यार्थिनींनी २०२२ मध्ये केलेल्या मानसिक आणि आर्थिक छळाच्या तक्रारीनंतर डॉ. जेसवानी आणि डॉ. कल्पना पांडे यांच्यात वाद सुरू झाला होता. कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या निलंबनाच्या संदर्भात डॉ. कल्पना पांडे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रवीण दटके आणि विष्णू चांगदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता डॉ. जेसवानी यांनी पुढे येऊन डॉ. कल्पना पांडे यांच्याकडून झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला आहे. डॉ. जेसवानी यांनी सांगितले की, त्या २० वर्षांपासून प्राध्यापक आणि १२ वर्षांपासून संशोधक मार्गदर्शक आहेत. मात्र, त्यांच्या दोन संशोधक विद्यार्थिनींना पीएच.डी.चा लघुशोधप्रबंध मंजूर करून घेण्यासाठी हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी मानसिक छळ करत पैशांचीही मागणी केल्याचा आरोप केला होता.

यानंतर मनोज पांडे यांच्या विरोधात चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र, डॉ. कल्पना पांडे यांनी राजकीय दबाव वापरून संपूर्ण प्रकरणाला वेगळा रंग दिला. तसेच विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप करून संशोधक विद्यार्थिनींना त्रास दिला आणि विविध समित्यांवरून पायउतार करत संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा काढून टाकल्याचा आरोप डॉ. जेसवानी यांनी केला. डॉ. पांडे या भ्रष्टाचारी असून त्यांनी अनेकांचा छळ केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जेसवानी यांनी केली.

बाविस्कर समितीने दोषी ठरवल्यावर न्याय नाही

उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव बाविस्कर यांच्या समितीने संशोधक विद्यार्थिनींवर अन्याय झाला असून, डॉ. जेसवानी यांचा संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा पुन्हा द्यावा असा निर्णय दिला. मात्र, त्यानंतरही न्याय मिळाला नाही असा आरोपही जेसवानी यांनी केला.

जेसवानी यांचे प्रमुख आरोप काय?

  • चौधरींच्या निलंबनानंतर कल्पना पांडे आता स्वत:च्या बचावासाठी विद्यापीठाची बदनामी करत आहेत.
  • पांडे यांनी जेसवानी यांचा संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा काढून घेतला.
  • विद्यार्थ्यांसमोर वर्गातून धक्का देऊन बोलावले.
  • सागर खादीवाला यांच्या देशभक्तीवर आधारित पुस्तकावर आक्षेप घेतला.
  • चार वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून, सोनू जेसवानी या जुने प्रकरण उखडून काढत विद्यापीठाची बदनामी करत आहेत.
  • सप्टेंबर २०२२ मध्ये संशोधक मुलींनी अंबाझरी पोलिसात तक्रार दिली होती. त्यामध्ये विष्णू चांगदे यांच्या सांगण्यावरून हे सगळं प्रकरण समोर काढल्याचा त्यांनी आरोप केला होता.
  • त्यानंतरही जेसवानी माझ्यावर खोटा आरोप करीत आहेत.
  • निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडककर यांच्या समितीने मनोज पांडे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. असे असतानाही मी न्यायाधीशांच्या समितीच्या निर्णयात ढवळाढवळ करते, हा चुकीचा आरोप आहे.
  • प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियानेही असाच निर्णय दिलेला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link