आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, नियमबाह्य पद्धतीने निविदा दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात दूध आणि शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार पुढे आणला होता. त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्य विभागातील रुग्णवाहिका घोटाळ्याचा आरोप केला.

पुणे : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला असून, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या ‘बीव्हीजी’ आणि ‘सुमित’ या कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोमवारी येथे केला. निवडणूक निधीसाठी या दोन कंपन्यांना पायघड्या घालण्यात आल्याने सावंत यांच्या या घोटाळ्याची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली.

रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात दूध आणि शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार पुढे आणला होता. त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्य विभागातील रुग्णवाहिका घोटाळ्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आरोग्यमंत्री सावंत हे हाफकिन संस्था ओळखण्यात चूक करतात. मात्र पैसे खाण्यात गल्लत करत नाहीत. नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या कामातून जमा झालेला कोट्यवधींचा निधी निवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील सुमित या कंपनीने त्यांना निविदा करून दिली होती. या कंपनीला स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. मात्र सुमित कंपनी निविदेमध्ये भागधारक झाली. त्यांना रुग्णवाहिका पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. सुमित कंपनीला काम मिळाल्यानंतर बीव्हीजी कंपनीकडून त्याबाबत तक्रार करण्यात आली. त्यामुळे बीव्हीजी कंपनीचाही निविदेमध्ये समावेश करण्यात आला. त्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी दबाव टाकला. बीव्हीजी कंपनीला अनेक ठिकाणी काळ्या यादीत टाकण्यात आले असतानाही त्यांना काम देण्यात आले. या रुग्णवाहिकेसाठी दोनवेळा निविदा काढण्यात आली. बाजारदरापेक्षा दुप्पट दराने रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये तसा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पवार यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link