भंडाऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

मतमोजणीत गडबड; ७ अधिकारी निलंबित

भंडारा :
नवभारत ब्युरो — नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा आणि मानवी चूक झाल्याप्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी कडक कारवाई करत ७ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मतमोजणीदरम्यान झालेल्या या गडबडीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईव्हीएम सिलिंग आणि तपासणीत गंभीर चूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गंभीर मानवी चूक

“ही गंभीर मानवी चूक असून ईव्हीएम सिलिंगचा दरम्यान हा प्रकार घडला आहे. दोषींची चौकशी करून कारवाई केली असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत,”
असे जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी स्पष्ट केले.

भंडारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ (अ) मधील मतदान केंद्र क्रमांक ९ वर तांत्रिक बिघाड उघडकीस आला. या प्रभागात उमेदवारांचे मत आणि नोटा (NOTA) असे पर्याय उपलब्ध असतानाही, मतदान यंत्रात केवळ चार उमेदवारांचेच पर्याय दिसत होते. यामुळे मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला.

उमेदवार न्यायालयात जाणार

या प्रकरणामुळे काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उमेदवार विनियमभंगाची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

निलंबित अधिकारी

या प्रकरणात खालील अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे —

  • सहाय्यक निवडणूक अधिकारी मोहम्मद सरवर
  • लिपिक पी.एस. मढवकर
  • लिपिक पी.एस. मढवकर
  • लिपिक पी.एस. लंगरवार
  • मतदान अधिकारी जे.एस. नादवे
  • मतदान अधिकारी मेघा साकरकर
  • ड्रायव्हर संजय मेश्राम

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांचा अवधी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *