Navdeep Singh hug Beit Sayah Sadegh video viral : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा समारोप रंगारंग सोहळ्याने झाला. २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि भारताने विक्रमी २९ पदके जिंकली. यामध्ये नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेकीच्या F41 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून लिहिला. त्याचा हा सामना बराच वादग्रस्त ठरला. कारण निकालांनुसार इराणचा खेळाडू बाईत साया सदेघ पहिल्या स्थानावर होता, परंतु पॅरालिम्पिक समितीने त्याला अपात्र ठरवले होते.
नवदीप सिंगने जिंकली चाहत्यांची मनं –
इराणचा खेळाडू अपात्र ठरल्यानंतर भारताच्या नवदीप सिंगच्या रौप्य पदकाचे सुवर्णात रूपांतर झाले. सुवर्णपदक जिंकून व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर नवदीप सिंगला आनंद तर झालाच, पण खाली रडणाऱ्या इराणी खेळाडूला पाहून तोही भावूक झाला. भारतीय पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंगला बाईत साया सदेघला अपात्र ठरवण्याचे कारण माहीत नव्हते. पॅरालिम्पिक समितीच्या निर्णयामुळे इराणचा खेळाडू नाराज आणि ध्वज हातात धरून रडायला लागला. नवदीप सिंगला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि आपले मोठे मन दाखवत त्याने व्यासपीठावरून खाली येऊन त्याला मिठी मारली. त्याने या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली.
नवदीप सिंग काय म्हणाला?
नवदीप सिंगने एका मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा इराणच्या खेळाडूला रेड कार्ड दाखवण्यात आले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. तो रडायला लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, तो रडत रडत होता. मी पण इतका भावूक झालो की मी त्याच्या जवळ जाऊन मिठी मारली. मी त्याला धीर दिला. तोपर्यंत मला नेमकं काय झालं माहित नव्हतं आणि या मोठ्या निर्णयामागचं कारण काय होतं.
नवदीप सिंग पुढे म्हणाला की, “जेव्हा मला सुवर्णपदक देण्यात आले, तेव्हा मला खूप आनंद झाला. टोकियो आता भूतकाळात आहे, पॅरिस वर्तमान आहे. मी माझ्या देशाचा अभिमान वाढवू शकलो याचा मला खरोखर आनंद आहे. मी भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक जोडू शकलो, याचा मला खरोखर आनंद आहे. लोक नेहमी सुवर्णपदक लक्षात ठेवतात.”
इराणच्या भालाफेकपटूला का अपात्र ठरवले?
पॅरिस पॅरालिम्पिकमधील पुरुष भालाफेक F41 ची अंतिम फेरी वादग्रस्त ठरली. इराणच्या भालाफेकपटूने थ्रोनंतर वारंवार वादग्रस्त झेंडा दाखवला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तो दोषी आढळला आणि पॅरालिम्पिक समितीने त्याला अपात्र ठरवले. यानंतर भारतीय पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंगला याचा फायदा झाला आणि त्याचे पदक रौप्य ते सुवर्णात बदलले. कांस्यपदक जिंकणाऱ्या चीनच्या पेंग्झियांगला आता रौप्यपदक आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या इराकच्या नुखैलावी वाइल्डनला कांस्यपदक देण्यात आले.