राजकीय अस्तित्वाच्या लढाईत शरद पवार नव्या चिन्हानिशी परत वर्धेच्या मैदानात उतरले आहेत.
वर्धा : राजकीय अस्तित्वाच्या लढाईत शरद पवार नव्या चिन्हानिशी परत वर्धेच्या मैदानात उतरले आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने वर्ध्याची जागा लढविली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षाने ही जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लढवित आहे.
काँग्रेस सोडून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी घेतला होता. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. ‘एकला चलो रे’ म्हणत त्यांनी राज्यभरात लोकसभेसाठी उमेदवार उभे केले होते. त्यावेळी वर्ध्यातून त्यांचे विश्वासू दत्ता मेघे हे उभे होते. सोबतीला रामदास तडस हे पण होते. १९९९ ला झालेल्या त्या निवडणुकीत मेघे यांना १ लाख ४९ हजार मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. तर काँग्रेसच्या प्रभा राव निवडून आल्या होत्या. भाजपचे सुरेश वाघमारे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आता तब्बल २५ वर्षांनंतर शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वाचा लढा परत सुरू झाला आहे. यावेळी वर्धेची जागा त्यांनी महाआघाडीकडून स्वत:च्या पक्षासाठी मागून घेतली. मात्र यावेळी तुतारी हे नवे चिन्ह त्यांच्या पक्षाला मिळाले आहे.