छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासू भाजप नेत्याच्या वक्तव्यानं उफाळला नवा वाद

Controversial Statment on Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सी.आर. पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. इतकंच नाही तर नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे वक्तव्य सी. आर. पाटील यांनी सुरत येथील एका जाहीर कार्यक्रमात केले. महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच केंद्रीय मंत्री पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले सी.आर.पाटील?

सुरतमध्ये पाटीदार समाजाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सी.आर. पाटील म्हणाले, मला सांगताना अत्यंत आनंद होतोय, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा पाटीदार समाजाचेच होते आणि त्यांनीच हिंदू स्वराज्याची स्थापना करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.महाराजांना एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत मांडल्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांना आता गुजराती करण्याचा प्रयत्न’

केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आता गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घणाघाती टीका खासदार राऊत यांनी केली आहे.

दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी सी.आर. पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील गडकोट फिरले पाहिजेत. केवळ राजकीय फायद्यासाठी अशी बेधडक वक्तव्ये करणे निषेधार्ह असल्याचे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

हे विधान पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित…

सी.आर.पाटील यांचे हे विधान पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. महाराज सर्वांचेच होते. मात्र, इतिहासाचा आधार घेतल्यास ते मराठा होते हे स्पष्ट आहे. राजकीय नेत्यांनी महापुरुषांबद्दल बोलण्यापूर्वी इतिहासाचे वाचन करण्याची गरज असल्याचे इतिहासकार संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत सी.आर.पाटील? (Who is C.R. Patil?)

सी.आर. पाटील (चंद्रकांत रघुनाथ पाटील) हे भारतीय राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व आहेत. सध्या ते केंद्र सरकारमध्ये जलशक्ती मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. गुजरात भाजपचे ‘चाणक्य’ म्हणूनही सी.आर. पाटील यांची ओळख आहे. ते गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात विधानसभेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू मानले जाते. सी.आर. पाटील यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहे, परंतु त्यांचे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कार्य गुजरातमध्येच घडले आहे.

निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?

राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्ष या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना, महाराजांना ‘पाटीदार’ म्हणणे भाजपसाठी महाराष्ट्रात बॅकफूटवर जाणारे ठरू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *