IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir : या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील पहिल्या सामन्याने सुरुवात होणार आहे. दुसरीकडे, ही बहुप्रतिक्षित मालिका सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगू लागली आहे. अशात काही दिवसांपूर्वी माजी दिग्गज रिकी पॉन्टिंगने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले होते, ज्यावर भारताचा कोच गौतम गंभीरने चोख प्रत्युत्तर दिले होते. आता यावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीने दिलेल्या प्रतिक्रियेने लक्ष वेधले आहे.

विराट कोहलीबाबत काय म्हणाला होता रिकी पॉन्टिंग?

आयसीसी रिव्ह्यू एपिसोडमध्ये बोलताना पॉन्टिंग म्हणाला होता की, “मी नुकतीच विराटची आकडेवारी पाहिली, त्यात असे दिसले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने फक्त दोन ते तीन कसोटी शतके झळकावली आहेत. ते मला योग्य वाटलं नाही. पण जर ते खरे असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षांत केवळ दोन कसोटी सामन्यात शतकं झळकावणारा टॉप ऑर्डरमधील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा कदाचित दुसरा कोणी नसेल.”

रिकी पॉन्टिंगच्या वक्तव्यावर गौतम गंभीरची प्रतिक्रिया –

गौतम गंभीर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रिकी पॉन्टिंगच्या वक्तव्याबाबत म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याला विराट आणि रोहितची चिंता नसावी. ते दोघेही एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही साध्य केलं आहे आणि भविष्यातही ते कायम साध्य करत राहतील. मला वाटतं, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अजूनही खूप कठोर परिश्रम करतात आणि ते अजूनही उत्कष्ट आहेत, त्यांना अजून खूप काही साध्य करायचे आहे आणि ते खूप महत्वाचे आहे.” यावर आता ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेवर माईक हसी काय म्हणाला?

गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेनंतर माईक हसीने फॉक्स क्रिकेटशी चर्चा करताना म्हणाला, “ते (टीम इंडिया) मानसिक आणि कौशल्याच्या दृष्टिकोनातून कुठे आहेत, हे पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही शोधून काढू. यामुळे त्यांना त्रास होईल, भारताकडे गुणवत्ता असलेले बरेच क्राउड पुलर्स आहेत. आम्ही आत्ताच गंभीरला रोहित आणि कोहलीच्या धावा न करण्याबद्दल बोलताना ऐकले. चॅम्पियन खेळाडूंना कमी लेखणे ही सर्वात मूर्ख गोष्ट आहे. आम्ही हे यापूर्वी अनेकदा पाहिले आहे. ते टीकेला सामोरे जातात, परंतु ते यातून बाहेर येतात आणि खरोखरच चांगली कामगिरी करतात. त्यामुळे मला त्यांच्याकडून ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. कारण भारतीय संघाचे खेळाडू उत्कृष्ट खेळाडू आहेत. पण तरीही मला वाटते की ऑस्ट्रेलिया फेव्हरेट असणार आहे.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link