Avneet Kaur Met Tom Cruise : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझबरोबर दिसत आहे. अवनीतने ‘मिशन : इम्पॉसिबल ८’च्या सेटवर टॉम क्रूझची भेट घेतली असून, तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अनुभव तिच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. या फोटोमुळे तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. तर, सोशल मीडियावर तिला अनेक जण शुभेच्छा देत आहेत.
अवनीत कौरची प्रत्येक पोस्ट नेहमीच व्हायरल होते; परंतु टॉम क्रूझबरोबरचा तिचा हा फोटो मीम पेजेससह इतर पेजेसवरही तुफान व्हायरल होत आहे. अवनीतने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिच्या आनंदाचे शब्दांतून वर्णन केले आहे. तिने लिहिले, “मला हे सगळं स्वप्नवत वाटतंय. मी आजही हे सगळं खरं आहे की स्वप्न हे जाणून घेण्यासाठी स्वतःला चिमटा काढून बघत आहे. मला माझ्या स्वप्नातला क्षण खऱ्या आयुष्यात अनुभवण्याची संधी मिळाली. मला ‘मिशन : इम्पॉसिबल’च्या आगामी चित्रपटाच्या सेटवर जायला मिळाले आणि तिथे थेट टॉम क्रूझला भेटण्याची संधी मिळाली. त्याचे धाडसी स्टंट्स पाहून मी स्तब्ध झाले. चित्रपट निर्मितीचा हा अनुभव अविश्वसनीय होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत मी अनुभवलेल्या क्षणांबद्दलचे आणखी काही अपडेट्स शेअर करीन. मी २३ मे २०२५ ची वाट पाहत आहे.”
अवनीत कौर ‘मिशन : इम्पॉसिबल ८’मध्ये दिसणार असल्याचा चर्चा
अवनीत कौरने टॉम क्रूझबरोबरचा फोटो शेअर केल्यापासून, ती या सिनेमात दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तशी चर्चा होण्याचे कारण म्हणजे अवनीतने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिला ‘मिशन : इम्पॉसिबल ८’च्या सेटला भेट देता आली. टॉम क्रूझचे अॅक्शन सीन्स बघता आले. मात्र, तिने कॅप्शनच्या शेवटी सिनेमा रिलीज झाल्यावर अधिक अपडेट्स शेअर करीन असे सांगितले आहे. त्यामुळे ती या सिनेमात टॉम क्रूझबरोबर दिसणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याआधी ‘मिशन : इम्पॉसिबल’च्या चौथ्या भागात बॉलीवूडमधील अभिनेते अनिल कपूर यांनी काम केले आहे. त्यामुळे अवनीतही ‘मिशन इम्पॉसिबल’च्या आगामी भागात झळकू शकते, असे म्हटले जात आहे.
अवनीतच्या चाहत्यांसह वरुण धवननेही केली कमेंट
या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘बेबी जॉन’फेम अभिनेता वरुण धवननेदेखील “वा!”, अशी कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “तू भारताच प्रतिनिधीत्व करत आहेस” दुसर्या चाहत्याने लिहिले, “ही मुलगी काहीही शक्य करू शकते.”