Ganesh Chaturthi 2024 Litton Das: गणेश चतुर्थीचा सण देशभरात आनंदात साजरा केला जात आहे. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे घरी आगमन झाले आहे. भारताबाहेरील क्रिकेटपटूंनीही हा सण आपल्या घरोघरी साजरा केला आहे. बांगलादेशचा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू लिटन दासने आपल्या घरी बाप्पाला विराजमान केले आहे आणि त्याची पूजा करत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
बांगलादेशचा खेळाडू लिटन दासनेही गणेश चतुर्थीनिमित्त घरी गणपतीची पूजा केली. लिटनने पत्नी आणि संपूर्ण कुटुंबासह पूजा केली, ज्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश भारतीय युजर्सनी कमेंट केली आहे. चाहत्यांनी लिटनला शुभेच्छा दिल्या आहेत.
अलीकडे बांगलादेशला अराजकता आणि भीषण हिंसाचाराला सामोरे जावे लागले. यानंतर बांगलादेशातील राजकीय परिस्थितीही बिघडली याचा एकंदरीत परिणाम संपूर्ण देशातील वातावरणावर झाला. यामुळे महिलांचा टी-२० वर्ल्ड कपही देशातून युएईमध्ये हलवण्यात आला. यानंतर बांगलादेशच्या पुरूष क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला कसोटी मालिकेत त्यांच्याच घरात पराभूत करत मोठा इतिहास घडवला. पहिल्यांदाच बांगलादेश संघाने पाकिस्तानचा कसोटीत पराभव केला आहे.
लिटन हा बांगलादेशचा एक महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने अनेक प्रसंगी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. लिटनने आतापर्यंत ७३ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने २६५५ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत. लिटनने ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५६३ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ५ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत. त्याची वनडे सर्वोत्तम धावसंख्या १७६ धावा आहे. लिटनने ८९ टी-२० सामन्यात १९४४ धावा केल्या आहेत.
बांगलादेशचा संघ १९ सप्टेंबरपासून भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अलीकडेच बांगलादेशने कसोटीत पाकिस्तानविरुद्ध २-० असा विजय मिळवला होता. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत केले होते. या मालिकेसाठी भारताने संघही जाहीर केला आहे.