संजय राऊत महाराष्ट्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवालांचं सरकार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तसेच, “लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फडणवीस सूडाचं राजकारण करत आहेत
“महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. आम्हीदेखील महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्री झाले. राज्याची एक परंपरा आहे, जी फडणवीसांना माहीत नसल्यास त्यांनी राज्याचं महाभारत समजून घ्यावं. ‘ती योजना बंद कर, ही योजना बंद कर’ असं सूडाचं राजकारण फडणवीस यांनी सुरु केलं आहे. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही,” असं सांगत, राऊतांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या दोन भागीदारांबद्दल त्यांनी काही न बोलण्याचा निर्णय घेतला, पण फडणवीस कपट करत आहेत आणि महाराष्ट्र ते पाहतो आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या चांगल्या योजना नावं बदलून चालवल्या, नवीन काहीही केलं नाही,” असंही राऊत म्हणाले.
फडणवीसांची झोप उडाली आहे
“फडणवीसांची झोप उडाली आहे कारण त्यांचं सरकार जाणार आहे. त्यांनी गाशा गुंडाळावा, कारण महाराष्ट्र त्यांच्या विश्वासात नाही. जे दळभद्री राजकारण त्यांनी सुरू केलं त्याचा शेवट जवळ आला आहे. लोकसभेला मोदी आणि शाह यांनी बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामुळे, हे लक्षात घ्या. हा महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देणार नाही,” असं राऊतांनी जोरदार इशारा दिला.
भाजपाकडून निवडणूक लांबवली आहे
“नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ‘वन नेशन वन इलेक्शन’ची घोषणा करतात, पण चार राज्यांतल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत कारण झारखंड आणि महाराष्ट्रात हरण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुका लांबवून लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता महिलांना लाच म्हणून देण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
राज्यात तीन घाशीरामांचं राज्य
“महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्याचं राज्य चाललं होतं, तसंच आता फडणवीस बोलत आहेत. सगळं अनागोंदी, अराजक चाललं आहे. लूटमार आणि अराजक याचाच काळ तेव्हा होता. आज महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल आहेत. घाशीराम कोतवालांचा इतिहास काय ते आम्ही लवकरच महाराष्ट्राला सांगू,” असा संजय राऊत यांनी इशारा दिला.