नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानक 2025-26 पर्यंत जागतिक दर्जाचे बनतील. याबाबत आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी बडनेरा, वर्धा, नागपूर भागातील रेल्वे कामांच्या सुरक्षेची पाहणी केली. रेल्वे रुळ, स्थानक इमारती, पूल, रेल्वे फाटक, रेल्वे कॉलनी, तसेच अमृत भारत स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
ते म्हणाले की, निर्भया योजनेअंतर्गत गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. नव्या ट्रेनबाबत ते म्हणाले, नागपूर-पुणे आणि मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्यांना मोठी मागणी आहे. नागपूर ते अयोध्या, पुणे, मुंबई, हैदराबाद येथे वंदे भारत सुरू करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात विविध बाबी तपासून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. याशिवाय स्लिपर कोच, तिसरी आणि चौथी लाईन आणि विविध मुद्द्यांवरही पत्रकार परिषदेत चर्चा झाली.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग कळंबपर्यंत पूर्ण झाला असून उद्घाटनानंतर या मार्गावरून गाड्या चालवण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही यादव म्हणाले. उद्घाटनाची तारीख दोनदा निश्चित करण्यात आली. मात्र ते रद्द करण्यात आले. मात्र, या मार्गिकेचे उद्घाटन फेब्रुवारीतच होणार असून वर्धा ते कळंब ही गाडी सुरू होणार आहे.